वै. श्री महंत महादेव महाराज (पहिले)
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सीना नदीच्या काठी खडकत नावाचे गाव आहे. या गावातील सर्वसुख संपत्र कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. प्रत्यक्ष योग्यांचा अवतार असल्यामुळे बालपणापासूनच महादेव भक्ती मार्गाला लागले.
मोठे झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरवले. त्यावेळी महादेवाने मला लग्न करायचे नाही आजन्म ब्रम्हचारी जीवन जगायचे आहे असे त्यांना सांगितले. पण कधीतरी ते आपणास लग्नास मजबूर करतील अशी भीती त्यांना वाटू लागली त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधू लागले. एके दिवशी एक वारकरयाची दिंडी पायी पंढरपुरास जात असल्याचे त्यांनी पहिले. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ते गुपचुपपणे दिंडीत सामील झाले आणि पंढरपूरला आले.
श्री. क्षेत्र पैठण येथील अनंत ॠषीचे शिष्य श्री. नारायण महाराज हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. ते ज्यावेळी मंदिरात आले.त्यावेळी महादेव आणि शेटीबा महाराजांनी त्यांना पहिले ते दोघांनाही पांडुरंगाच्या चतुर्भुज रुपात दिसू लागले तेव्हा त्या दोघांनी नारायण महाराजाचे चरणी साष्टांग दंडवत घातले आणि आम्हास अनुग्रह देऊन उध्दार करण्याची विनंती केली.त्यांनी त्यांना अनुग्रह दिला नंतर श्री नगद नारायण महाराज, महादेव आणि शेटीबा गडावर आले ते कायमचेच.
महादेवाने गडावर आल्यानंतर नगद नारायण महाराजांच्या मार्ग दर्शनाखाली एकांत स्थानी तप्चर्या केली. नारायण महाराजानंतर शके १७३४ साली ते गुरु पंरपरेने गडाच्या गादीवर बसले आणि त्यांनी भागवत धर्म प्रसाराचे काम तन, मन, धनाने केले. नगद नारायण महाराजांनी चालू केलेल्या अत्रछात्रात त्यांनी आणखी वाढ केली आणि गडाच्या बांधकामास सुरुवात केली. महादेव महाराजांचे वैशिष्टय असे होते कि ते गड सोडून गडाखाली कधीही भिक्षेसाठी गेले नाहीत. तरी देखील बांधकामासाठी व इतर अनेक कामासाठी त्यांना पैशाची किंवा अत्रधान्यांची गरज पडली नाही.
त्याच्या काळात त्यांनी स्वयंभू महादेवाचे मंदिर हेमांडपंथी पध्दतीने बांधले. महादेव मंदिराच्या दक्षिणेस श्री. विठ्ठल रखुमाइचे दगडी मंदिर देखील त्यांनीच बांधले. एकूण (१५) पंधरा वर्ष ते गडाच्या गादीवर राहिले आणि गडाच्या बांधकामाची मुहूर्त मेढ रोऊन आपले नाव अजरामर केले. मित्ती पौष वद्य ९ शके १७४९ साली महादेव महाराजांनी आपली आत्मज्योत परब्रम्हात विलीन केली.