पालखी सोहळा
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय.पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पान्दारीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.
भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपवणुक व्हावी या उद्देशाने श्री क्षेत्र नारायणगड संस्थेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारीकरीता पंढरपूरला जातांना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यानी ग्रासलेली अनेक छोटी गांवे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गांवांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दुर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण.
पालखीचा प्रवास :-
श्रींच्या पालखी सोहळ्याचा पायदळ प्रवास श्री नारायण गड ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत २०० किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते नारायण गड पर्यंत परतीचा प्रवास हा २०० किलोमिटर आहे. असा एकूण प्रवास ४०० किलोमीटरचा आहे.
श्री क्षेत्र नारायणगड ते पंढरपूर नगद नारायण महाराज दिंडी जाण्याचा मार्ग
श्री क्षेत्र नारायणगड – बेलुरा – बेलखंडी (पाटोदा ) – पाचेगाव (पाचंग्री ) – दुधडी – गणेगाव – बावची – लहू (लव्हरा) – कुर्डूवाडी – मोडनिंब – पंढरपूर.
श्रींच्या पालखीचा परतीचा मार्ग :-
श्री क्षेत्र पंढरपूर – पांढरेवाडी – उजनी – शेडशिंगा – सालसा – तांदळवाडी – ऊण्डा पिंपळगाव – शिऊर – चुंबळी – हिवरशिंगा – श्री क्षेत्र नारायणग गड .
स्वागत :-
श्रींचे पालखीचे स्वागताकरीता गावांतील भजनी मंडळी, बँड पथक, महिला मंडळ तुलसी वृदांवनासह येतात. मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या असतात. स्वागताच्या कमानी उभारल्या जातात. तसेच पुष्प वर्षाव केल्या जातो.
श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते. तसेच श्रींच्या पालखीचे गावांतील नागरीकांकडून श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते.
प्रवासात असणाया सोई :-
श्रींचे पालखी सोबत प्रवास करतांना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगलकार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. सकाळी स्नानाकरीता पाण्याची व्यवस्था असते. कांही ठिकाणी भक्त आपआपल्या परीने वारकरी मंडळीची सेवार्थ व्यवस्था करतात.
प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी वारी नक्कीच अनुभवावी….