वै. महंत श्री महादेव महाराज (तिसरे)
श्री. महादेव महाराज यांचा जन्म मित्ती मार्गशीर्ष व २ शके १८५३ इसवी सन १९३१ साली रोजी शुक्रवार दिवशी पाटोदा तालक्यातील मौजे पौंडुळ या गावी झाला. नारायण गडाच्या परिसरातील पुण्यभूमीत त्यांचा जन्म झाला.शालीवाहन शके १८५९ साली महंत माणिक महाराज कैलासवासी झाले. त्यावेळी नारायण गडाच्या गादीचे आठवे वारस म्हणून श्री. महादेव महाराज यांच्यावर जवाबदारी पडली अगदी बालवयात गडाच्या गादीवर येणारे श्री. महादेव महाराज हे पहिलेच महंत आहेत.त्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही. परंतु आपला अध्यात्मिक अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे या विषयी त्यांना फार तळमळ लागली ती पूर्ण करण्यासाठी ते श्री. क्षेत्र पंढरपूर येथे राहू लागले तेथे तीन वर्ष राहून आपला अभ्यास पूर्ण केला.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी गेल्यावर तेथे वारकऱ्यांची राहण्याची सोय नव्हती त्यामुळे त्यांनी ता. ३१-१२-१९६३ रोजी बंकटस्वामीच्या मठा जवळ संस्थानाच्या मठासाठी जागा खरेदी केली. जागेची दक्षिणोत्तर लांबी १५२ फुट असून पूर्वपश्चिम रुंदी ७२ फुट आहे. त्या जागेवर सध्या ५२ खन लाकडी माळवद व तितकीच वर माडी असे बांधकाम आहे. त्यामुळे यात्रेकरूंची सोय झाली.
श्री क्षेत्र पंढरपूर प्रमाणेच त्यांनी नारायण गडावर देखील बांधकाम केले श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व स्वयंभू महादेव मंदिर यांच्यावरील दोन्ही शिखरांचा जीर्णोध्दार व रंगरंगोटीचे काम त्यांनी दिनांक २०-१०-१९७९ रोजी केले. श्री. नगद नारायण महाराज यांचे समाधी मंदिरा वरील सोळा (१६) मीटर उंचीचे नवीन शिखर त्यांनी बांधले या शिखरावर सर्व संताच्या प्रतिमा कोरल्या आहेत या शिखराचे बांधकाम दिनांक २६-४-१९८३ रोजी पूर्ण झाले. त्यामुळे तेथील सौंदर्यात फार आकर्षकता आणि भव्यता आली आहे.
मधल्या वाडयात स्वयंपाकासाठी चौदा खन लाकडी माळवदाचे बांधकाम केले. चौदा पत्र्याच्या दोन खोल्या बांधल्या त्यांनी शासनाकडून देखील बरीच कामे करून घेतली. गडावर लाईटची देखील सोय झालेली आहे. त्यांनी मौजे बेलुरा या गावी एक विहीर खोदून तीन किलोमीटर एवढया अंतराची पाईप लाईन केली व गडावरील पिण्याच्या पाण्याची सोय केली. गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी गडावर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. जे विधार्थी अत्यंत गरीब आहेत त्यांच्यासाठी संस्थानामार्फत मोफत वसतीगृह चालू केले.बेलुरा येथील विहीर आटल्यामुळे गडावर तीव्र पाणी टंचाई सुरु झाली ती दूर करण्यासाठी महाराजांनी शासकीय तीर्थक्षेत्र विकास अनुदानातून पौडूळ येथील धरणातून २ किमी लांब पाईपलाईन करून पाणी टंचाई दूर केली.
ही सर्व कामे करीत असताना महाराजांनी धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या श्रध्देने चालूच ठेवले. दरवर्षी मित्ती जेष्ठ व ३० (अमावश्या) या दिवशी गडावरून आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरला जाते. तेथे पांडुरंगाचे दर्शन व कला घेऊन दिंडी परत पायी पायी मित्ती आषाढ व ९ (नवमी)या दिवशी गडावर परत येते. पंढरपूर प्रमाणेच मित्ती फाल्गुन व (२) बिजेच्या दिवशी दिंडी पायी पायी श्री. संत एकनाथ महाराज यांच्या गावी म्हणजे श्री क्षेत्र पैठणला जाते व एकनाथ महाराजांचे दर्शन व काला घेऊन व्दादशीला परत येते. या दोन्ही दिंड्यामध्ये भाविक भक्त मोठया संख्येने हरीनाम संकिर्तनाचा आनंद उपभोगतात.
श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाचे वार्षिक अखंड हरीनाम सप्ताह देखील मोठ्या उत्साहाने साजरे होतात. श्री महादेव महाराज यांच्या स्वभावातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांना जास्त बोलणे आवडत नाही. त्यांनी जर एखादयाला अंतः करण पूर्वक आशीर्वाद दिला तर तो कदापि वाया जात नाही. असेच एकदा बेलुरा या गावातील श्री जनार्दन गवते या गृहस्थाची वाणी अचानक बंद झाली. त्यांनी खूप डॉक्टरी ईलाज केले, परंतु बोलता येईना. त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांना घेऊन गडावर आले. त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी महाराजांना सर्व हकीगत सांगितली. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे जनार्दन गवते चार पाच दिवस गडावर राहिले. शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर आरतीच्या वेळेस जवळ उभा केले. नंतर नगद नारायण महाराजांचे स्मरण करून भस्म पाण्यातून पिण्यास दिले. व नगद नारायण महाराज कि जय असे म्हणण्यास सांगितले. परंतु पहिल्या वेळेस त्यांच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. दुसऱ्यावेळी अस्पष्ट असा आवाज निघाला व तिसऱ्या वेळी पूर्वी होता त्याप्रमाणे त्यांनी गजर केला. हा चमत्कार पाहणारे हजारो लोक आज साक्षी आहेत.
शिरापूर या गावी मोठी यात्रा भरत होती व त्यानिमित्ताने तेथे २०० ते २५० बकरी चा बळी दिला जात असे महाराजांचा पशु हिंसेला विरोध होता त्यांनी गावकर्यांना हि प्रथा बंद करण्याची विनंती केली व ती मान्य केली नाहीतर गावात येणार नाही असे खडसावले. गावकर्यांनी मीटिंग घेऊन हि पशु हिंसा बंद केली तसेच बेलूरा गावची पशु हिंसा आणि काजळा गावातील म्हसुबा यात्रेनिमित्त होणारी पशु हिंसा महाराजांनी कायमची बंद केली.
या पूर्वी गडावर जे जे महात्मे होऊन गेले त्यांच्या त्यांच्या गावी महादेव महाराज स्वतः गेले आणि त्या त्या गावात त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याची विनंती केली ती गावकऱ्यांनी मोठया आनंदाने मान्य केली.या पुण्यातीथिला व गावोगावी होणाऱ्या सप्ताहा च्या निमिताने महाराजांचा बराच काळ प्रवासात जात असे त्यामुळे जेवणात नियमितपणा राहिला नाही. आहाराच्या अनियामितेमुळे त्यान मधुमेह झाला. शरीर उतरवयास लागल्यामुळे साथ देईनासे झाले त्यातच इलाजासाठी घेतलेल्या औषधाचा शरीरावर दुष्परीनाम होऊ लागला. डॉक्टराच्या उपचाराला शरीर साथ देईनासे झाले. उपजे ते नासे या सृष्टीच्या नियमानुसार महंत श्री महादेव महाराजानी वयाच्या ७९ वर्षी मिती आषाढ वद्धय ४ मंगळवार रोजी दि. १९-०७-२०११ दुपारी ३ वाजता आपला देह ठेवला आणि वैकुंठगमन केले.
महाराज गेल्याची वार्ता संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली मिळेल त्या वाहनाने लाखो लोक अंत्य दर्शनासाठी गडावर जमा झाले. त्याचबरोबर सर्व संत, महंत देखील आले. महाराजांनी आपल्या उत्तराधिकार्याची लिखित नोंद करून ठेवली नव्हती. अशा पेच प्रसंगात आलेल्या सर्व संत, महंताच्या मार्गदर्शनाने व संस्थानाच्या विश्वस्त मंडळ, परिसरातील सर्व गावच्या नागरिकांच्या विचाराने ह.भ.प. श्री शिवाजी महाराज शेकटेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ह.भ.प. श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते संन्याशाच्या परंपरेनुसार महंत महादेव महाराज यांना समाधी देण्यात आली.