Images

वै. श्री महंत नारायण महाराज

पंढरपूर निवासी श्री विठ्ठलाच्या आदेशावरून नारद महामुनींनी अवतार घेतला ते ठिकाण श्री क्षेत्र संस्थान नारायण गडापासून ३५ कि. मी. दूर आहे. बीड आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्हाची सिमा असलेली पुण्यशील आणि पतितांना पावन करणारी दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर गेवराई तालुक्यात सुरळेगाव या गावात आरबड घराण्यात पाटलाचे उदरी, शालिवाहन शके १६५५ साली नारदाने अवतार घेतला. त्याच्या आई वडिलांनी त्यांचे नाव नारायण असे ठेवले.
नारायणाचे वय थोडे मोठे झाल्यावर ते कधी कधी रानात गुरे घेऊन चारण्यासाठी जात असत. रानात गेल्यावर गुरे सांभाळण्या ऐवजी एकांतात बसत व नामस्मरणात रममाण होऊन जात, त्यात त्यांचा किती वेळ गेला हे त्यांना देखील कळत नसे, त्या वेळी गुरे ढोरे ईतरत्र जाऊन लोंकाचे पिक खातील व नारायणास घरी त्रास होईल, म्हणून स्वतः पांडुरंग गुप्तरूपाने गाई राखण्याचे काम करीत असत.

आपल्या मुलाला लिहिता वाचता यावे त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना श्री संत एकनाथ महाराजांची पुण्यनगरी म्हणजे श्री क्षेत्र पैठण येथील श्री सदगुरु अनंत महाराजाच्या चरणी ठेवले. तेथे नारायणाचे शिक्षण पूर्ण झाल्यवर अनंत महाराजांनी त्यांना सांप्रदाय पध्दतीने अनुग्रह दिला व सांप्रदाय प्रसाराची आज्ञा देऊन नारायणास स्वगृही पाठवले.

घरी आल्यानंतर नारायण महाराजाचे घरात लक्ष लागेना सांप्रदायिक अनुग्रह मिळाल्यामुळे त्यांना सारखा पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागला. एके दिवशी ते शेतात औत हाकीत होते, त्यावेळी रस्त्याने वारकरयांची दिंडी पंढरपुरास जात असलेली त्यांनी पाहिली. दिंडी पाहून पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्याची त्यांची ईच्छा प्रबळ झाली. त्याच क्षणी त्यांनी औताला काढण घातले आणि बैलांना गोठयाच्या वाटेला लाऊन औतासह हाकलून दिले बैल नारायणाशिवाय औत घेऊन गोठयावर आले, तिकडे नारायण पंढरपूरला जाण्यासाठी दिंडीत सहभागी होऊन सत्संगाचा आनंद लुटू लागले. वारीहून परत घरी आल्यावर वडील त्यांच्यावर खूप रागावले. ते त्यांनी मुकाट्याने सहन केले. पुढे काही दिवसांनी नारायणाचे पितृछत्र हरपले. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येउन पडली. गरिबीच्या संसार प्रांपाचत ते विविध तापाने पूर्ण होरपळून गेले त्यामुळे त्यांचे मन संसारातून विटले गेले, संसारा विषयी त्याच्या मनात घृणा निर्माण झाली. नंतर ते गाव सोडून निघून घेले, ते परत न येण्याची प्रतिज्ञा करूनच.

नारायण महाराजांचे जन्मगाव जरी सूरळेगाव असले, तरी त्यांची कर्मभूमी स्वयंभू महादेवाचे आणि ॠषी मुनीचे वस्तीस्थान असलेले ठिकाण म्हणजे आजचे श्री क्षेत्र संस्थान नारायणगड हेच आहे. नारायण महाराजांनी स्वयंभू महादेवाच्या दक्षिणेस “श्री विठ्ठल रुक्मीणीच्या ” मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. त्यांची नोंद खालील प्रमाणे करून ठेवली.

श्री नारायण महाराजांनी फसली सन १२०३ शके १७१५ प्रमाथी नाम संवत्सरे माघ मासे शुक्ल पक्षे १३ तिथी सोमवासरे ते दिनी श्री पांडुरंग रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या प्रमाणे पत्रिका लिहून ठेवली म्हणजे या घटनेस आज दोनशे वीस (220) वर्ष पूर्ण होत आहेत. भजन, प्रवचन आणि कीर्तन याबरोबरच महाराजाचा अत्रदानावर फार भर होता. त्यांनी भक्तांना दिलेले आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नसत. आज देखील आपले संसारीक दु:ख नाहीसे होण्यासाठी त्यांना श्रध्देने आणि एक निष्ठपणे जर प्रार्थना केली तर ती फलद्रूप होते असा अनेकांचा अनुभव आहे.

श्री नगद नारायण महाराजांनी गडाची स्थापना करून एकोणवीस (१९) वर्ष समाज प्रबोधनाचे कार्य केले. आपले अवतार कार्य संपले हे जाणून श्री. नगद नारायण महाराजांनी मिती फाल्गुन वद्य एकादशी शके १७३४ साली आपला देह इहलोकी ठेवून आत्मज्योत अव्यक्त परब्रम्हात विलीन केली व आपली इहलोकीची यात्रा संपवली.