Images

श्री महंत शिवाजी महाराज

श्री शिवाजी महाराज यांचा जन्म बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यात शेकटे या खेडे गावात श्री मनोहर रामराव शेंबडे व सागरबाई शेंबडे या दाम्पत्यांच्या घरात दि. १२-०४-१९५४ सोमवार या दिवसी झाला. त्यांच्या घराण्यात पूर्वीपासूनच वैष्णव सांप्रदायिक वारसा चालत आलेला होता. घरात सर्व माळकरी मंडळी होती व नेहमी पांडुरंगाची उपासना होत होती. श्री क्षेत्र नारायण गडाची वारी कोणातेही संकट आले तरी बंद पडू द्यायची नाही असा त्यांच्या घरातील नियम होता. त्यामुळे अध्यात्मिक संस्काराचे बाळकडू त्याना घरातूनच मिळाले होते.

शिवाजी महाराज बालपणी मित्रांना जमवून फुटक्या डब्याचा पखवाज बनवायचे व दगडांना ताळ समजून भजन करायचे व भजन संपल्यावर घरोघरी फिरून धान्य जमा करायचे त्यानंतर त्याची कन्या आमटी करून सर्वांना प्रसाद करून वाटायचे. या त्यांच्या खेळांचे गावकरी खूप कौतुक करीत असत .

गावात सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते चकलांबा येथील शाळेत जाऊ लागले परंतु तेथे इयत्ता नववी नंतर त्यांचा अध्यात्मिक शिक्षणाकडे ओढ वाढल्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण बंद केले. एके दिवसी पुढील अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी महाराज फक्त अंगावरील कपड्यानिशी व पुण्यापर्यंत पुरतील एवढे पैसे घेऊन आळंदीला निघाले. पुण्यात आल्यानंतर एका सज्जन गृहस्थाच्या मदतीने त्यांनी आळंदी गाठली. तेथे त्यांनी ह.भ.प. श्री जयराम महाराज यांच्या आश्रमात २ वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे ४ वर्षे गुरुवर्य जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत काढली या ४ वर्षाच्या काळात त्यांना ह.भ.प. श्री विठ्ठल महाराज घुले आणि ह.भ.प.श्री मारोती महाराज कुऱ्हेंकर यांचे मार्गदर्शन लाभले.

आळंदीहून गावी परत आल्यावर वारकरी संप्रदायाचा प्रसार व्हावा व आपल्या हातून समाज प्रबोधनाचे कार्य घडावे या उदात्त हेतूने गावोगावी कीर्तन , प्रवचन सुरु केले. घराण्यात सुरु असलेली श्री क्षेत्र नारायण गडाची शुद्ध एकादशीची वारी ते करू लागले . गडावर वारी सुरु केल्यानंतर महंत ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराजाची ओळख झाली. शिवाजी महाराजांचे पहिले कीर्तन मौजे सोनगावात नारळी सप्ताहानिमित्त झाले. मग महादेव महाराजांनी त्यांना प्रत्येक नारळी सप्ताहात तसेच गडावरील कार्याक्रमात कीर्तन व प्रवचन करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुरु शिष्याचे नाते निर्माण झाले आणि महादेव महाराज त्यांना मार्गदर्शन करू लागले. पुढे महादेव महाराजांची तब्बेत ठीक नसताना त्यांनी दिलेला आदेश पाळून सलग १५ वर्षे नारळी सप्ताहात काल्याचे कीर्तन शिवाजी महाराजांनी केले. त्यांनी पहिले मंदिर गावी बांधले ते श्री संत जगद्गुरू तुकोबारायाचे. आपल्याला समाज प्रबोधन करण्यासाठी कायम स्वरूपी एखादे ठिकाण असावे यासाठी त्यांनी महादेव महाराजांकडे मागणी केली. महादेव महाराजांनी मौजे मादळमोही तालुका गेवराई जि. बीड येथील ग्रामस्था बरोबर चर्चा केली त्यास होकार देऊन गावातील श्री सीताराम धोंडीराम हारकुट यानी स्वत:च्या मालकीची ३० गुंठे जमीन दान दिली.

मग श्री शिवाजी महाराजांनी परिसरातील गावकर्याच्या मदतीने तेथे श्री संत जगद्गुरू तुकोबारायाचे भव्य मंदिर, सभामंडप व भक्तीनिवासाचे काम पूर्ण करून दि. ३१-०१-१९९९ मिती माघ शु.१५ रोजी तुकोबारायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्या निमित्त आयोजित सप्ताहाला वै.महंत महादेव महाराजांनी आठ दिवस मुक्काम करून स्वतः च्या हाताने या नवीन मादळमोही संस्थानाच्या गादीवर शिवाजी महाराजाना बसवले. तेव्हापासून आजपर्यंत तेथे प्रती वर्ष अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. शिवाजी महाराजांनी इ.स. १९९७ पासून दर महा शुद्ध एकदासीला सुरु केलेली मादळमोही ते श्री क्षेत्र नारायणगड पायी दिंडी आजही सुरु आहे.

वै. महंत महादेव महाराजांनी गडावरील अखंड हरीनाम सप्ताहाचे नियोजन शिवाजी महाराजाकडे सोपवले ते त्यांनी सक्षमपणे पार पाडले. तसेच त्यांनी ५० गावात अखंड हरीनाम सप्ताहा सुरु केले. ज्या गावातील मारोती उघड्यावर किंवा मंदिर पडेलेले होते तेथे त्यांनी गावकर्यांच्या मदतीने शिखारासाहित मंदिर बांधले. मौजे मादळमोही पासून ३ किमी अंतरावरील विठ्ठलगड नावाच्या जुन्या संस्थानाचा जीर्णोद्धार केला. तेथे सभामंडप व भक्तीनिवासाचे बांधकाम केले. महाराजांनी विठ्ठल गडावर जाण्यासाठी ३ किमी चा रस्ता श्रमदानातून करून घेतला व गडावर ५५ फुट खोल विहीर खोडून पाण्याची व्यवस्था केली.

हे समाज कार्य करत असतानाच एक दु:खद घटना घडली श्री क्षेत्र नारायण गडावरील महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराज यांची प्राण ज्योत अनंतात विलीन झाली . श्री क्षेत्र नारायणगडावरील नितांत श्रद्धा व महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराज यांची केलेली निष्काम सेवा यांचे फळ म्हणून संत , महंत , विश्वस्त मंडळ , गावकरी, समस्त भक्तगण या सर्वांनी गडाचे नवीन मठाधिपती व महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराजाचे उत्तराधिकारी म्हणून महंत श्री शिवाजी महाराजांची निवड केली .

नारायण गडावर आल्यानंतर श्री शिवाजी महाराजांनी प्रथम गोशाळा बांधण्यास अग्रक्रम दिला कारण सुमारे १५० गायीसांठी उन व पावसापासून संरक्षण मिळेल असा निवारा नव्हता म्हणून ते काम त्यांनी पूर्ण केले. राजुरी ते नारायणगडा पर्यंत रस्त्याचे काम शासनाकडून पूर्ण करून घेतले. पंढरपूर येथील मठाचे वै. महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराजानी सुरु केलेले बांधकाम पूर्ण केले. पौडूळ येथील धरणात विहीर खोदून गडावर पाण्याची व्यवस्था केली. तसेच हत्ती दरवाजापासून दुसऱ्या मजल्यावर कमानी , दक्षिण दरवाजा पर्यंत भिंतीचे काम करून एक मजली स्लब चे काम केले. गडावर येणाऱ्या भाविकांची दर्शनाची सोय व्हावी म्हणून दर्शन हॉल पासून मंदिरापर्यंत लोखंडी पूल तयार केला. उत्तरेकडील दरवाजापासून पश्चिमेकडील दगडी भिंतीचे राहिलेले काम पूर्णत्वास नेले.

श्री क्षेत्र नारायण गडाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेनुसार पूर्वी असलेला ” क ” दर्जा सुधारून ” ब ” दर्जा शासनाकडून मिळवला. व तीर्थक्षेत्र दर्जा “ब ” नुसार गडाच्या विकास कामासाठी शासनाकडून रुपये २ कोटी निधी मंजूर करून घेतला. तसेच पैठण व आळंदी येथे जाणाऱ्या गडाच्या परिसरातील भक्तांची राहण्याची सोय व्हावी यासाठी श्री क्षेत्र पैठण येथे दि. ०१-०५-२०१३ रोजी १२ गुंठें व आळंदी येथें मठासाठी जागा घेतलेली आहे व लवकरच तेथे बांधकामास सुरुवात होईल. नारायण गडाचा विकास श्री नगद नारायणाच्या कृपेने आणि वै. महंत गुरुवर्य महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत शिवाजी महाराजाच्या नेतृत्वाखाली वाढतच राहणार आहे.