पूर्व इतिहास

सध्या आपल्या भारत भूमीवर जी जी प्राचीन तिर्थ क्षेत्र आहेत, त्या त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रास काही न काही विशेष इतिहास आहे. तो फक्त इतिहासच नाही तर त्यात विशेष अशी शक्ती असते. म्हणूनच आज ती आपले श्रद्धास्थान बनलेली आहेत. त्याला अनुसरून ” श्री क्षेत्र संस्थान नारायण गड ” यांसदेखील चमत्कारांनी औतप्रोत भरलेला स्वतंत्र इतिहास आहे. आपण जेव्हा एखादया ठिकाणाचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास त्या ठिकाणा विषयीच्या लोक कथा, काव्य, शिलालेख, ताम्रपट, आख्यायिका इत्यादी अनेक साधनाचा संग्रह करून त्याचा अभ्यास करावा लागतो व तो सर्व पडताळून पाहून सत्यासत्य ओळखून जी सत्यकथा तयार होते त्यास आपण इतिहास म्हणतो.

वरील प्रमाणे पुराव्या आधारे जो “श्री क्षेत्र संस्थान नारायणगड” या संस्थानाचा इतिहास तयार केला तो पुढील प्रमाणे आहे. श्री ह. भ. प. गोविंद महाराज यांच्या काळात सौताडा या गावी रावजी भवानजी हे श्री नगद नारायण महाराजाचे भक्त होऊन गेले त्यांनी गडाविषयी काही काव्य लिहून ठेवलेले आहे. त्यावरून गडाच्या पुर्वेइतिहासावर बराच प्रकाश पडतो त्याच्या आधारे हा इतिहास लिहिला आहे .

सत्य युगात प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून सीतेसह लक्ष्मण, हनुमंतराय, सुग्रीव, अंगद, नळ, नीळ, जाबुवंत इत्यादी भक्तगनासह पुष्पक विमानात बसून आयौध्येकडे जात होते. जेव्हा हे विमान आकाशमार्गाने या डोंगरावरून जाऊ लागले, तेव्हा विमानाच्या घंटा आपोआप वाजू लागल्या आणि विमान वरचेवर थांबले ते पुढे चालेना, हे पाहून प्रभू रामचंद्राने जांबुवंतास विमान थाबण्याचे व घंटा वाजण्याचे कारण विचारले त्यावर जांबुवंताने पुढील प्रमाणे उत्तर दिले.

देवाधिदेवा प्रभुरामचंद्रा या डोंगराच्या गुहेत तेरा महान असे सिध्द ॠषी तपश्चर्या करीत आहेत. त्यांना तुमच्या चरणाचे दर्शन हवे आहे. त्यासाठीच ते तपश्चर्या करीत असल्यामुळे त्यांच्या तपोबलाने विमान थांबले आहे. तरी आपण त्यांना दर्शन देण्याची कृपा करावी.

प्रभू रामचंद्र त्यांच्या तपाने आनंदी झाले. त्यांच्या भेटीची ओढ प्रभूरामचंद्रास देखील लगली. त्यांनी तात्काळ आपले विमान खाली उतरविले. गुहेतील सर्व ॠषी मुनींना बाहेर बोलावले आणि सर्वाना दर्शन देऊन कृतार्थ केले. सर्व सिद्ध मुनींनी यथायोग्य प्रकारे पूजा करून त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या तपश्चर्याने आणि आदरातिथ्याने प्रभू रामचंद्रास देखील अत्यानंद झाला त्यांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी सर्व मुनींनी हात जोडून विनंती केली कि, ” हे देवादिदेवा प्रभूरामचंद्रा आमचे आपणास असे मागणे आहे, कि, तुमचा दीर्घ काळा पर्यंत आम्हास सहवास लाभाव यासाठी आपण यथे वास्तव्य करावे त्यांचे मागणे ऐकून रामचंद्राने त्यांना सांगितले कि ते या अवतारात शक्य नाही तरी पुढे कलियुगात मी बौद्धावतार घेईल त्यावेळी आपणास माझा दीर्घ सहवास लाभेल असे त्यांनी ॠषीणा वचन दिले आणि तोपर्यंत येथेच तपश्यर्या करीत रहावे अशी आज्ञा देऊन प्रभू रामचंद्र आयौध्येस गेले.

श्री.प्रभुरामचंद्राची आज्ञा शिरसावंद मानुन सर्व ऋषी मुनी तेथेच तपश्यर्या करून आपला काळ घालू लागले ते ठीकाण म्हणजेच आजचे “ श्री क्षेत्र संस्थान नारायण गड ” होय. अशा प्रकारे श्री क्षेत्र संस्थान नारायण गड हि तेरा सिद्धांची अनेक युगांची तपोभूमी आहे. एकाच सिद्ध पुरुषांच्या क्षणिक वास्तव्याने पावन झालेल्या भूमीत अनंत जड जीवांचा उध्दार करण्याचे सामर्थ्य असते. येथे तर तेरा सिद्धांनी काही युगांची तपश्यर्या केलेली आहे. प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रम्हांड प्रभू रामचंद्राच्या पद स्पर्श या भूमीस लागलेला आहे कलियुगात बौध अवतारानंतर स्वतः श्री विठ्ठल रुक्मिणी मातेसह ब्रम्हदेव, महादेवादी देवासह येथे येवून गेले आहेत. एवढी हि भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे.
यावरून हे संस्थान किती श्रेष्ठ व पावन आणि पवित्र असेल हे स्पष्ट होते.

About