Images

वै. श्री महंत नरसू महाराज

बीड तालुक्यातील मुर्शद्पुर या गावी श्री. नरसू महाराज यांचा जन्म झाला बालपणापासूनच त्यांचा परमार्थाकडे ओढा होता अशातच नरसू आपल्या घराच्या अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून नामस्मरण करू लागला. त्यांची झाडाखाली बसण्याची वेळ आणि जागा ठराविक असे. अशी त्यांची साधना चालू असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला कि, ते ज्या लिंबाच्या झाडाखाली नामस्मरणाला बसत त्या झाडाची त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या फांदीचा पाला गोड झाला व आजही आहे, ही दंतकथा नसून सत्यकथा आहे. फक्त एकाच फांदीचा लिंबाचा पाला गोड आणि बाकीचा सर्व कडू असणारे अदभुत आणि चमत्कारीक लिंबाचे झाड त्यांच्या जन्मठीकाणी म्हणजे मौजे मुर्शदपुर ता. जि. बीड या गावी आज ही अस्तीत्वात आहे.

एका दिवाळीच्या दिवशी त्यांचे वडील स्वतः नरसुसाठी लाडू करंज्या वगैरे पक्वान्नाचे जेवण घेऊन गेले. त्यांनी नरसुच्या हाती जेवण दिले आणि स्वतः त्यांच्या नकळत झाडावर चढून बसले. दुपारची जेवणाची वेळ झाली तेंव्हा नरसुने नित्याप्रमाणे आपले सर्व जेवण गाईगुरांना चारले आणि आपण स्वतः लिंबाचा पाला खाल्ला व पाणी पिऊन भगवंताच्या नामस्मरणात रममाण झाले. हे जेव्हा वडिलांनी पाहिले त्यांना फार काळजी वाटू लागली. त्यांनी नरसुवर कोणाकडून तरी उपचार करण्याचे ठरविले.

त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नारायण गडावर आणले.त्यावेळी गडावर असलेले महंत श्री. गोविंद महाराज यांच्या चरणी मस्तक ठेऊन त्यांना नरसुची बालपनापासुनाची सर्व हकीकत सांगितली. गोविंद महाराजांनी नरसुला आपाद मस्तक न्याहाळले आणि हा फार महान तपस्वी होणार असल्याचे ओळखले. त्यांनी नरसुला येथेच ठेऊन जाण्यास त्यांच्या आईवडिलांना सांगितले.

नारायण गडावर आल्यावर नरसुच्या खऱ्या साधनेला सुरुवात झाली. त्यांनी पूर्ण पने अन्नाचा त्याग केला लिंबाचा पाला आणि फराळाचे पदार्थ खाऊन ते उपवास करू लागले तो नियम त्यांनी आयुष्यभर पाळला. म्हणून त्यांच्या समाधीला आजदेखील नित्य फराळाचा नैवेध अर्पण करतात.

नरसू महाराजांनी एकूण छत्तीस (३६) वर्ष मोठी खडतर तप्चर्या केली त्यामुळे त्यांना अशी सिद्धी प्राप्त झाली होती की, बांधकामावरील मजुरांची मजुरी ते स्वतः देत असत. पिशवीत हात घालून ते मोघम पैसे काढीत व न मोजता मजुराला देत असत. जेव्हा मजूर बाजूला जाऊन ते पैसे मोजीत तेव्हा ते त्यांच्या मजुरी इतकेच भरत असत कमी किंवा जास्त भरत नसत.

गोविंद महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांनी गोविंद महाराजांच्या समाधीचे बांधकाम केले. तळमजला बांधला,गवंड्याचा वाडा बांधला, पश्चिम आणि उत्तर बाजूला असलेल्या दोन्ही वेशी त्यांनी बांधल्या, पूर्वेकडील बाजूस असलेला सर्वात मोठा हत्ती दरवाजा त्यांनी बांधला, सामानाची ने आण करण्यासाठी येथे उंट होते यावरून हे संस्थान किती संपन्न होते याची कल्पना येते.

नरसू महाराज खूपच थकले होते त्यांना चालणे फिरणे देखील जमेना त्यामुळे इतर ठिकाणी जायचे असल्यास ते मेण्यात बसून जात असत, हा मेणा त्यांना हैद्राबादच्या निजाम सरकार कडून मिळाला होता. अशा या महान तपस्व्याने मित्ती मार्गशीर्ष व (१) प्रतिपदा शके १८०५ ई. स. १८८३ साली आपला देह ठेवला आणि वैकुंठगमन केले.