Images

वै. श्री महंत गोविंद महाराज

बीड जिल्यातील करचुंडी या गावी शिंदे घराण्यात श्री. गोविंद महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे वैशिष्टय असे होते कि, ते बसले असता त्यांचे गुडघे कानाच्या वर जात असत.. ज्योतिष सिद्धांतानुसार “ज्या व्यक्तीचे गुडघे कानाच्या वर जातात ती व्यक्ती कोणीतरी संत किंवा देवता यांचा अवतार असते” म्हणून लहानपणापासूनच लोक त्यांना ‘अवलिया बाबा’ म्हणत असत.

ते सतत आसपासच्या तीर्थक्षेत्रावर सदगुरु भेटतील अशा भावनेने जात असत. असेच एकदा ते शु. एकादशीला श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड येथे आले. त्यावेळी गडावर महंत दादासाहेब महाराज हे होते. दादासाहेबाच्या कीर्तनाचा त्यांच्या मनावर असा विलक्षण परिणाम झाला कि एके दिवशी गोविंदाने मोठया कळवळीने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी, मला अनुग्रह देऊन माझा उध्दार करावा अशी अंतः करण पूर्वक प्रार्थना दादासाहेब महाराजांना केली.

पुढे त्यांनी गडाचा सर्व कारभार गोविंद महाराजावर सोपवला आणि ते त्यांना फक्त मार्गदर्शन करू लागले. त्यांनी गोविंद महाराजांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले. मित्ती माघ शु. ७ शके १७५७ साली दादामहाराजांनी वैकुंठ गमन केले त्यावेळी गोविंद महाराजांना फार दुः ख झाले. गडाच्या गादिवर आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या गुरुचे राहिलेले अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचे ठरविले आणि वेगाने कामास सुरुवात केली.

सर्व प्रथम त्यांनी श्री. नगद नारायण महाराजांचे समाधी मंदिर बांधले. नगद नारायण महाराजांच्या समाधीच्या डाव्या बाजूस पहिले महादेव महाराज आणि उजव्या बाजूस शेटीबा उर्फ दादा महाराज यांची समाधी आहे. या तीन समाध्यांची मिळून एकच मोठी समाधी गोविंद महाराजांनी बांधली तीच श्री. नगद नारायण महाराजांची समाधी म्हणून आज आपण दर्शन करतो. विठ्ठल रखुमाई मंदिरावरचे शिखर त्यांनी बांधले.

गोविंद महाराजांनी गंगाघाट खोदून पाणी टंचाई दूर केली. त्या आधी उन्हाळ्यात गडावर आसपासच्या गावातून लगडीने पाणी आणावे लागत असे आजच्या सभामंडपाच्या जागी जो दगडी सभामंडप होता तो त्यांनी बांधला होता. दोन दीपमाळा बांधल्या चोहोबाजूनी ज्या पोवळी होत्या त्या जागी भिंती बांधल्या भिंतीलगत वावऱ्या बांधल्या या प्रमाणे कामे करून सर्व गैरसोयी दूर केल्या.

आपले सदगुरू वैकुंठवासी शेटीबा महाराज यांचे गडाच्या बांधकामाचे राहिलेले अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करू शकलो याचे त्यांना मोठे समाधान लाभले आता आपण गुरु ॠणातून मुक्त झालो हे त्यांनी जाणले आणि मित्ती मार्गशीर्ष वद्य ३० (अमावस्या) शके १७८९ साली आपली आत्मज्योत निर्गुण निराकार परब्रम्हात विलीन केली.